पाकिस्तानने बळकावलेला भाग सोडावा   

रणधीर जैस्वाल यांनी खडसावले

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबतच्या संबंधांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखतीत केलेल्या विधानाने पाकिस्ताने प्रतिक्रिया दिली आहे. मोदींचे विधान एकतर्फी असून, दिशाभूल करणारे असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानने एक दिवसाआधी दिली. त्यावरून आता भारतानेही पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत भारताच्या भागावरील अवैध कब्जा रिकामा करा असा इशारा दिला आहे.
 
भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी अधिकृतपणे निवेदन जारी करत म्हटले की, प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेत पाकिस्तान सर्वात मोठा अडथळा आहे. पाकिस्तानने अवैध आणि बळजबरीने कब्जा केलेला भारताचा भूभाग रिकामा करावा. पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील जम्मू-काश्मीर राज्याबाबत काही टिप्पणी केल्याचे ऐकले. खरा मुद्दा पाकिस्तानकडून सीमेपलीकडे दहशतवादाला खतपाणी देणे हा आहे, हे जगाला माहिती आहे. वास्तविक हाच मुद्दा शांतता आणि सुरक्षेसाठी अडथळा आहे, असे त्यांनी सांगितले.
 
अमेरिकन इंटेलिजेंस चीफ तुलसी गबार्ड यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानी पुरस्कृत हल्ल्यावरील प्रश्नाला उत्तर दिले. इस्लामिक दहशतवाद हा असा धोका आहे, ज्याने भारत आणि अमेरिकेसह मध्य पूर्व देशातील अनेकांचे नुकसान केले आहे असे गबार्ड यांनी म्हटले होते. तुलसी गबार्ड यांच्या मुलाखतीत मोदींनीही भारत आणि अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि सागरी, सायबर सुरक्षेसाठी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. 
 
अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. त्यात भारत-पाकिस्तान संबंधांवर मोदींनी पाकिस्तानला फटकारले. भारताकडून शांततेसाठी करण्यात आलेला प्रत्येक प्रयत्न शत्रुता आणि विश्वासघाताने अयशस्वी केला. 

पाकिस्तानचा आरोप?

 
पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान एकतर्फी असल्याचे म्हणत जम्मू-काश्मीर वादग्रस्त मुद्दा असल्याचे म्हटले. जम्मू-काश्मीरचा सात दशकाचा जुना वाद भारताच्या संयुक्त राष्ट्र, पाकिस्तान आणि काश्मिरी नागरिकांना दिलेल्या आश्वासनानंतरही सोडवला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला. 

Related Articles